सांगली जिल्हा
ऑडिओ उपलब्ध
आष्ट्यात शॉर्टसर्किटमुळे ४० एकर ऊस जळून खाक
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
वाळवा : आष्टा-मर्दवाडी रस्त्यावरील कुंबळे मळा आणि थोटे मळा परिसरात विजेच्या तारांमधील शॉर्टसर्किटमुळे सुमारे ४० एकर आडसाली ऊस आगीत जळून खाक झाला. ही भीषण घटना सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली असून, यामुळे बाधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. भरदुपारी लागलेल्या या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. उसाच्या फडांमधून आगीच्या उंच ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट उठू लागले. आग वेगाने पसरल्याने पाहता पाहता मोठ्या क्षेत्रावरील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दुर्दैवाने ऊसशेतीपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने अग्निशामक वाहनाला घटनास्थळी पोहोचता आले नाही, ज्यामुळे आग आटोक्यात आणताना मोठ्या अडचणी आल्या. स्थानिक शेतकरी व तरुणांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने आग नियंत्रणात येऊ शकली नाही. सदर दुर्घटनेत अर्जुन चव्हाण, सुहास चव्हाण, राजू पाटील, लोडकर, कुशाल वग्याणी, नीलम पाटील, प्रकाश आवटी, काकेश चौगुले, उल्हास कुबडे आणि राजेश पाटील आदी शेतकऱ्यांचा आडसाली ऊस जळून खाक झाला. ऐन गाळप हंगामाच्या तोंडावर उभा ऊस जळाल्याने बाधित शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पुढील नुकसान टळावे यासाठी संबंधित साखर कारखान्यांच्या शेती विभागाने या जळालेल्या उसाची तातडीने तोडणी करून तो कारखान्याला गळितासाठी न्यावा, तसेच प्रशासनाने त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.