थेट डिजिटल पोर्टल मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / कोल्हापूर जिल्हा / बातमी

शक्तीपीठ महामार्गाविरोधात १३ जिल्ह्यांचा एल्गार

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
शक्तीपीठ महामार्गाविरोधात १३ जिल्ह्यांचा एल्गार
कोल्हापूर : राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या शक्तीपीठ महामार्गास कडाडून विरोध करण्यासाठी अखेर १३ जिल्ह्यांतील शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक कोल्हापूर येथे पार पडली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील आणि आमदार सतेज पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत सरकारच्या दडपशाहीविरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला असून, आंदोलनाची व्याप्ती आता मराठवाडा आणि विदर्भात वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्य सरकार सर्व कायदे धाब्यावर बसवून, केवळ पोलिस बळाचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या गळ्याखाली रेटण्याचा प्रयत्न करत आहे. "शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच कडाडून विरोध आहे. तरीही कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता, जबरदस्तीने जमिनीची मोजणी आणि संपादन करण्याचे बेकायदेशीर प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत," असा संतप्त आरोप यावेळी शेट्टी यांनी केला.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, यापुढे ज्या ज्या गावांमध्ये प्रशासन जमिनीची मोजणी करण्यासाठी येईल, त्या सर्व गावांमध्ये संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी स्वतः मोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहून ते केवळ शेतकऱ्यांना कायदेशीर व धोरणात्मक मार्गदर्शन करणार नाहीत, तर वेळप्रसंगी प्रशासनाशी व पोलिसांशी दोन हात करून असहकार्याची भूमिका घेतील. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन मोजू दिली जाणार नाही, यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले. आमदार सतेज पाटील म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेला हा लढा आता संपूर्ण राज्यभर पसरवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पुढील काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात प्रचंड मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. याची सुरुवात लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांतून होणार असून, येथे शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य 'एल्गार मेळावे' आणि आंदोलने आयोजित केली जाणार आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून मराठवाडा व विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारला हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडले जाईल, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे आगामी काळात शक्तीपीठ महामार्गाचा वाद चिघळण्याची आणि सरकार विरुद्ध शेतकरी असा तीव्र संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

(सदरची बातमी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जोशी यांनी संपादित केली आहे)
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.