थेट डिजिटल पोर्टल सोमवार, 19 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

आगळीवेगळी परंपरा जपणारा विट्याचा दसरा महोत्सव !

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
आगळीवेगळी परंपरा जपणारा विट्याचा दसरा महोत्सव !
विजयादशमी म्हणजे पुरुषार्थ दाखवून विजय संपादन करण्याचा दिवस. सांगली जिल्ह्यातील विटे येथील दसरा महोत्सव हा राज्यातील इतर ठिकाणच्या दसरा महोत्सवापेक्षा आगळा वेगळा आहे. येथे दसऱ्याला देवाच्या पालख्या पळविण्याची शर्यत असते. हजारो लोकांची यावेळी उपस्थिती असते. कराड विजापूर रस्ता माणसांनी फुलून जातो. पालख्या पळविण्याच्या स्पर्धेत चुरस असते. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. दसऱ्याच्या दिवशी दुपारी देवाच्या पालख्या पळवत शिलंगणाच्या माळावर न्यायची पद्धत फार जुनी आहे. आजतागायत याच पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. विट्याच्या पूर्व बाजूला असलेल्या डोंगरात श्री रेवणसिद्घ देवाचे मूळस्थान म्हणून ओळखले जाणारे एक देवस्थान आहे. या दिवशी सुळेवाडी येथील मूळस्थानची पालखी विट्यातील सिद्धनाथाच्या मंदिरात येते. येथे थोडावेळ थांबून दुपारी चार वाजता परत मूळस्थानाकडे जावयास निघते. पाहुणा म्हणून आलेल्या रेवणनाथाला निरोप देण्यासाठी सर्व ग्रामदैवते एकत्र येतात. निरोप घेऊन रेवणसिद्घ पालखीतून मूळस्थानाकडे निघाले की त्यांच्याबरोबर विट्यातील भैरवनाथाची पालखी देखील बाहेर पडते. दोन्ही पालख्या शिलंगण माळ येथे जात असताना त्यांच्यात पुढे जाण्याची चुरस लागते. इर्षेपोटी कसबी खांदेकरी पालख्या पळविण्याचा निकराचा प्रयत्न करतात. कोणीही शर्यत जिंकली तरी वादावादी न करता सर्वजण शिलंगणाच्या माळावर एकत्र जमतात. शमीचे पूजन करतात.
या शर्यतीचा प्रारंभ नेमका कधी झाला याबाबत मतभिन्नता आहे. या उत्सवाची सुरवात अश्विन शुध्द प्रतिपदेला होते. भैरवनाथ, म्हसवड सिद्धनाथ, जगुबाई, सिद्धनाथ मंदिरात विधिपूर्वक घटस्थापना केली जाते. दररोज वेगवेगळा पोशाख करून मूर्ती सजवली जाते. रात्री या चार देवांच्या पालख्या एकत्र येतात. डवरी, आरादी इत्यादी देवाची आराधना करतात. दसऱ्यापर्यंत हा कार्यक्रम चालू असतो.
पालख्या पळविण्याची ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली हे माहीत नसले तरी पाटील घराण्याने या प्रथेस योग्य ती बैठक देऊन चालना दिली. या प्रथेविषयी असे सांगितले जाते की, साखरे घराण्यातील मूळ पुरुष हा श्री रेवणसिद्धाचा भक्त होता. रोज पहाटे उठून तो डोगरावरील मूळ स्थानाकडे जात असे. रेवणसिद्घ दर्शन घेऊन तो रोजच्या नित्यकामाला सुरवात करीत असे. वयोमान व प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्याला ते शक्य होईना. या सत्पुरुषास रेवणसिद्घ यांनी विट्यात येऊन दर्शन दिले. साखरे घराण्याच्या इराप्पा साखरे या पूर्वजास ज्या जागेत रेवणसिद्घ यांनी दर्शन दिले तेथेच रेवणसिद्घ मंदिर आहे. आप्पा बसाप्पा साखरे यांनी लोकवर्गणीतून हे मंदिर बांधले. नवनाथ भक्तीसार या ग्रंथात त्याचा उल्लेख आहे. दसऱ्याच्या दिवशी दुपारी नाथ मंदिराजवळच्या पटांगणात भैरवनाथ, म्हसवदसिद्ध, भैरोबा, रेवणसिद्घ, मूळस्थान अशा पाच पालख्या वाजत गाजत पेठेतील काळेश्वर मंदिराजवळ येतात. पालख्याच्या दर्शनास रस्त्याच्या दुतर्फा भाविक उभे असतात. लहान मुलांना रस्त्यावर झोपवले जाते. त्यावरून पालखी नेली जाते. काळेश्वर मंदिराजवळ एक पांढरी रेघ ओढली जाते. येथून पालखी पळविण्याचा रिवाज आहे. पालखीपुढे हत्ती, वाजंत्री, मोरांगी, छबिना, छत्र असते. मूळस्थानच्या पाहुण्या रेवणनाथाच्या पालखीला पाच पावले पुढे उभे राहण्याचा मान असतो. गावच्या पाटलांनी निरोप दिला की कसबे खांदेकरी सुसाट वेगाने पालख्या पळवितात. कसबी खांदेकरी रस्त्यात ठिकठिकाणी गट करून उभे असतात. काळेश्वर मंदिर ते शिलंगण माळ अशी ही पालखीशर्यत असते. अन्य कोणत्याही गावी दसऱ्याच्या कार्यक्रमात महिला सहभागी होत नाहीत मात्र येथे महिलांची गर्दी असते. राज्यात कोठेही अशी शर्यत नाही. पालखीचे वजन जास्त असते. ती पळवणे ही एक प्रकारची कसरतच असते. पूर्वी पालख्या पडण्याचे प्रकार घडत होते. मात्र आता रस्त्याला दुभाजक असल्याने हा प्रश्न !मिटला आहे. कसबी खांदेकरी  आठवडाभर पालख्या पळविण्याचा सराव करतात. सुरवातीला अब्दागिरीवाला पळत जातो. पालखी शर्यतीची ती पूर्वसूचना असते. देवाला पालखीत बांधून पळविण्याची ही आगळीवेगळी शर्यत असते.

(सदरचा लेख ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जोशी यांनी संपादित केला आहे)
जाहिरात • Vishal Vivaj (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.