थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / जनरल / बातमी

आतापर्यंतच्या ठळक बातम्या थोडक्यात !

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
आतापर्यंतच्या ठळक बातम्या थोडक्यात !
१) राज्यभरातील मुसळधार पावसाचा फटका भाजीपाला उत्पादनाला बसू लागला असून, बाजारात आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. पाऊस ओसरल्यानंतर ग्राहकांची मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात फरसबी २०० रुपये, वाटाणा २४० रुपये, तर आले २८० रुपये किलो दरापर्यंत पोहोचले आहे. पालेभाज्यांच्याही किमती वाढल्या असून, पुढील काही दिवस दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


२) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडून पैसे लंपास करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न कणकवली पोलिसांच्या जलद कारवाईमुळे फसला आहे. बँकेची अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, नोएडा नियंत्रण कक्षाची तत्परता आणि पोलिसांनी वेगाने फिरवलेली तपासाची चक्रे यामुळे लाखो रुपयांची चोरी टळली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अथर्व महेश राणे (वय १९, रा. कळसुली, गवसेवाडी) याला शिताफीने ताब्यात घेतले आहे.

३) जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक संकेत आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आज मंगळवारी भारतीय शेअर बाजाराला मोठ्या घसरणीचा सामना करावा लागला. अमेरिका आणि इराणमधील वाढता संघर्ष तसेच कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती यांमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. दिवसभरातील प्रचंड चढ-उतारांनंतर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 561 अंकांच्या घसरणीसह 77,055 वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 159 अंकांनी घसरून 24,052 च्या पातळीवर स्थिरावला.

४) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. वारीदरम्यान कोणतीही दुर्घटना किंवा अपघात घडल्यास वारकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने 'विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2026' लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार, वारीदरम्यान एखाद्या वारकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या निकटच्या वारसाला चार लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच एखाद्या अपघातात संबंधित वारकऱ्याला 60 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास दोन लाख 50 हजार रुपये मदत मिळेल.

५) स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न बाळ गणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण मंडळाकडून येत्या दिड महिन्यात पाच हजार घरांसाठी लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार परिसरातील घरे या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात परवडणाऱ्या दरात घर घेण्याची संधी अनेक इच्छुकांना मिळू शकते.

६) गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाडा आणि कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. देशभरात रेंगाळलेला मान्सून आता पुन्हा एकदा गती पकडण्यासाठी सज्ज झाला आहे. पॅसिफिक (प्रशांत) महासागरात निर्माण झालेली एक मोठी हवामानविषयक हालचाल आता थेट बंगालच्या उपसागरापर्यंत येवून पोहोचली आहे. या प्रणालीमुळे बाष्पयुक्त हवा वेगाने वरच्या दिशेने ढकलली जात असून, आकाशामध्ये पावसाळी ढगांची मोठी दाटी होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देशात पुन्हा एकदा जोरदार पावसाची इनिंग सुरु होईल, अशी दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

७) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा आहे. काही मंत्र्यांना डच्चू तर काही नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. यातच बीडच्या परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे आणि पुण्याच्या मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.

८) राज्यभरात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नभेसळ आणि अमली पदार्थांविरोधात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. त्यानंतर आता सुरक्षित, दर्जेदार आणि प्रमाणित रक्ताची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, एफडीएने रक्त साठवणूक केंद्रांविरुद्ध एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ३८ संस्थांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३४ परवाने निलंबित करण्यात आले असून चार कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

९) गुन्ह्याचे ठिकाण कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असले, तरीही देशातील किंवा शहरातील कोणत्याही पोलिस ठाण्यात आता भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) नवीन तरतुदींनुसार, तक्रार नोंदवली जाऊ शकते. गुन्हा आपल्या हद्दीत घडला नाही, हे कारण सांगून आता पोलिस तक्रारदाराला गुन्हा नोंद करून घेण्यास नकार देवू शकत नाहीत. पोलिसांना गुन्हा नोंदवून घेऊन त्याला नियमित अनुक्रमांक न देता ‘शून्य’ क्रमांक दिला जातो. प्राथमिक तपास सुरू करावा लागतो. तसेच वैद्यकीय मदत पुरवणे किंवा पुरावे गोळा करणे अशी कारवाई करावी लागते. प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, हा एफआयआर मूळ घटना घडलेल्या पोलिस ठाण्याकडे हस्तांतरित केला जातो.
जाहिरात • Rajkumar Nikam (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.